RBI ची खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई
रिझर्व्ह बँकेने (RBI)कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेसह देशातील चार सहकारी बँकांविरोधात दंडाची कारवाई केली आहे. कोटक महिंद्रा बँकेवर 1.05 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर (Kotak Mahindra Bank)मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर 1 कोटी 5 लाख रुपयांचा दंड लावला आहे. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेविरोधातही (IndusInd Bank)अशीच कारवाई करण्यात आली आहे. कोटक महिंद्रा बँकेवर जे आरोप आहेत, तेच आरोप इंडसइंड बँकेविरोधातही लावण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यानेच या बँकांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेशिवाय रिझर्व्ह बँकेने देशातील चार सहकारी बँकांविरोधात कारवाई केली आहे. कोटक महिंद्रा बँकेविरोधात 1.05 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ‘दि डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेरनेस फंड स्कीम’मधील काही नियमांमध्ये अनियमितता आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रॅन्जॅक्शन आणि लोन अॅडव्हान्सच्या नियमांची अवहेलना केल्यामुळेही हा कारवाई केली गेली. केवायसीच्या (kyc-know your customer) नियमांचे पालन न केल्याने इंडसइंड बँकेविरोधत कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नमूद केले.
सहकारी बँकाविरोधात कारवाई
याशिवाय रिझर्व्ह बँकेने इतर चार सहकारी बँकांनाही दंड ठोठावला आहे. त्यामध्ये नवजीवन सहकारी बँक, बलनगिर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बलनगिर, धकुरिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कलकत्ता आणि पलनी को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (नंबर ए 331), पलनी यांचा समावेश आहे. कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेशिवाय या चार बँकाविरोधात कारवाई करून दंड ठोठावण्यात आला आहे. सहकारी बँकांविरोधात 1 लाख ते 2 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
मात्र बँकाविरोधातील ही कारवाई आणि त्यानुसार आकारण्यात आलेल्या दंडामुळे बँकांच्या ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, अनियमिततेचा ठपका ठेवत बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याचा ग्राहकांच्या ट्रान्झॅक्शन वा अॅग्रीमेंटवर काहीही परिणाम होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. बँक आणि ग्राहकांमध्ये जे अॅग्रीमेंट आहे, ते पूर्वीप्रमाणेच लागू राहील व त्यात कोणताही बदल होणार नाही.