अवघ्या 4 रुपयांचा शेअर पोहोचला 787 रुपयांवर, 163 पट रिटर्न्स; लखपती झाले करोडपती
Share Market | 20 वर्षांपूर्वी एक्सिस बँकेच्या समभागाची किंमत अवघी 4.81 रुपये इतकी होती. ती आता 787.40 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. या कालावधीत एक्सिस बँकेच्या समभागाने गुंतवणूकदारांना 163 पट परतावा मिळवून दिला आहे.
मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे एक्सिस बँक (Axis Bank). या समभागाने गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.
20 वर्षांपूर्वी एक्सिस बँकेच्या समभागाची किंमत अवघी 4.81 रुपये इतकी होती. ती आता 787.40 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. या कालावधीत एक्सिस बँकेच्या समभागाने गुंतवणूकदारांना 163 पट परतावा मिळवून दिला आहे.
या समभागाने गेल्या एक महिन्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला नाही. मात्र, गेल्या 6 महिन्यांत, NSE वरील Axis बँकेच्या शेअरची किंमत 635 रुपयांवरून 787 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 25 टक्के परतावा मिळाला आहे.
एका वर्षात 70 टक्के उसळी
एक्सिस बँकेच्या समभागाने एका वर्षात 468 रुपयांवरून 787.4 रुपयांवर झेप घेतली आहे. याचा अर्थ समभागाची किंमत जवळपास 70 टक्क्यांनी वाढली आहे. एक्सिस बँकेचे शेअर्स गेल्या 5 वर्षात 520.65 रुपयांवरून 787.40 रुपयांवर गेले. गेल्या 10 वर्षात या स्टॉकने 250 टक्के परतावा दिला आहे.
त्याचप्रमाणे, गेल्या 20 वर्षांमध्ये, हा स्टॉक 4.81 रुपयांपासून (एनएसईवर 12 ऑक्टोबर 2001 रोजी बंद होणारी किंमत) 787.40 रुपये (एनएसईवर 11 ऑक्टोबर 2021 रोजी बंद किंमत) पर्यंत वाढला आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी एक्सिस बँकेच्या समभागात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य जवळपास 1.63 कोटी रुपये इतके झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना आता 1.25 लाख रुपये मिळतील. तर वर्षभरापूर्वी एक्सिस बँकेच्या समभागात गुंतवणूक केलेल्या एक लाखाचे मूल्य आता 1.70 लाख इतके झाले आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
संबंधित बातम्या:
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक
फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही