Cash At Home : कपाटातील नोटा, करतील तोटा! जाणून घ्या रोखीचा हा नियम
Cash At Home : घरात किती रक्कम ठेवावी याविषयी काही नियम आहेत. या नियमांचे तुम्ही पालन केले नाही तर तुम्हाला शिक्षा पण होऊ शकते..
नवी दिल्ली : नोटबंदीपासून नागरिकांनी घरात रोख (Cash) रक्कम ठेवणे कमी केले आहे. परंतु, अजूनही अनेक लोक एटीएममध्ये जाणं टाळतात. ते बँकेतून कॅश आणून थेट घरात ठेवतात. गरजेनुसार ही रक्कम खर्च करतात. काही रक्कम बचत म्हणून गाठीशी घरातच ठेवतात. अनेक जण डिजिटल व्यवहार न करता रोखीतून सर्व व्यवहार करतात. परंतु, तुम्ही घरात भरमसाठ रोख रक्कम ठेवली तर तुमच्या डोक्याला ताप होऊ शकतो. कारण घरात किती रक्कम ठेवायची याविषयाचा नियम आहे. या नियमांचे पालन न केल्यास शिक्षा पण होऊ शकते. त्यामुळे याबाबतचा नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
नियम काय सांगतो प्राप्तिकर खात्याच्या नियमानुसार, घरात किती रोख रक्कम असावी यासंबंधीचा स्पष्ट आदेश, निर्णय, नियम नाही. तुम्हाला घरात किती पण रोख रक्कम ठेवात येते. पण ही रक्कम तुमच्याकडे कोठून आली. तिचा स्त्रोत काय याची माहिती देणे तुम्हाला आवश्यक आहे. ही माहिती देण्यात तुम्ही नापास झाला तर मग मात्र तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते.
तर कडक कारवाई ही संपत्ती बेनामी असल्यास, तिचा स्त्रोत माहिती नसल्यास, अथवा ही संपत्ती वाममार्गाने जमा केली असल्यास कडक कारवाईची तरतूद नियमात आहे. याविषयीचे कायदे कडक आहे. त्यामुळे घरात आढळलेल्या रोख रक्कमेसंबंधीच्या उत्पन्नाचे स्त्रोत दाखविणे आवश्यक आहे. तुमच्याकडे या रोख रक्कमेसंबंधीचे कागदपत्रे असतील तर घाबरण्याचे काम नाही. तसेच याविषयीचे आयटी रिटर्न्स असतील तर मग विचारायलाच नको.
तर भरा दंड जर आयकर विभाग तुमच्या उत्तरावर समाधानी नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचे साधन कोणते आणि उत्पन्न कुठून मिळविले याचे उत्तर द्यावे लागेल. त्यासाठीची कागदपत्रे सादर करावी लागतील. पण दस्ताऐवजात गडबड दिसून आली तर मात्र तुम्हाला दंडाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
137 टक्के कर कागदपत्रांत सुसूत्रता नसेल आणि अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. गडबड आढळली तर नियमांचे उल्लंघन केले म्हणून तुम्हाला एकूण उत्पन्नावर 137 टक्के कर मोजावा लागेल. ही रक्कम फार मोठी असली तरी ती जमा करावी लागेल.
रोखीचा नियम जर तुम्ही बँकेत वार्षिक 20 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागते. जर तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर तुमच्यावर दंड लावण्यात येईल.
पॅनकार्ड दाखवा एका वर्षात 1 कोटींचा व्यवहार करत असाल तर तुम्हाला 2 टक्के टीडीएस द्यावा लागेल. एका दिवसात बँकेतून 50 हजार रुपये अथवा त्यापेक्षा कमी कॅश काढत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड दाखवावे लागेल. जर तुम्ही 30 लाख रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता थेट रोखीत खरेदी केली, तर तुम्हाला त्याविषयीच्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेत. 2 लाख रुपयांवरील खरेदी केवळ कॅशनेच करता येत नाही.