Vodafone Idea युजर्सना दिलासा? कंपनीचे सीईओ म्हणतात….
Vodafone Idea | Vodafone Idea कडून ग्राहकांना उत्तम सेवा आणि चांगले पर्याय देणे सुरुच राहील. गेल्या वर्षभरात ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले.
मुंबई: कर्जाच्या बोझ्यामुळे डबघाईला आलेल्या आयडिया-व्होडाफोन कंपनीच्या ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच कुमारमंगलम बिर्ला Vodafone Idea च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे ही कंपनी बंद पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर कंपनीचे सीईओ रविंदर टक्कर यांनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Vodafone Idea कडून ग्राहकांना उत्तम सेवा आणि चांगले पर्याय देणे सुरुच राहील. गेल्या वर्षभरात ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. आगामी काळात Vodafone Idea डिजिटल इंडियन आणि डिजिटल भारत या अभियानाच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल, असे रविंदर टक्कर यांनी म्हटले. यावेळी रविंदर टक्कर यांनी कुमारमंगलम बिर्ला यांचा राजीनामा किंवा कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल भाष्य केले नाही. मात्र, त्यांच्या एकंदर प्रतिपादनाचा सूर आश्वासक दिसला.
Vodafone-Idea लिमिटेड दिवाळखोरीत निघणार?
कुमारमंगलम बिर्ला यांच्या पत्रातील उल्लेखानुसार Vodafone-Idea लिमिटेड कंपनी डबघाईला आली आहे. आता कंपनीचा गाडा हाकणे अवघड असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला Vodafone-Idea लिमिटेडकडे 27 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळेच या कंपनीची सूत्रे सरकार किंवा अन्य कोणाकडे सोपवून कारभार सुरु ठेवण्याचा विचार कुमार मंगलम बिर्ला यांनी बोलून दाखवला आहे.
व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा
व्होडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. हे फसवणूक करणारे नो युवर कस्टमर (KYC) च्या माध्यमातून वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. सायबर फसवणुकीसंदर्भात एअरटेलने जारी केलेल्या अॅडवायजरीनंतर व्हीआय(Vi)चा इशारा आला आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात फसवणूक करणारे नवीन तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल वापरकर्त्यांना कसे शिकार बनवत आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठलल यांनी सांगितले आहे. असाच एक प्रकार आता व्हीआय(Vi) सब्सक्राइबर्समध्येही दिसून येत आहे, जिथे व्होडाफोन आयडियाचे कर्मचारी बनून फसवणूक करणारे लोक त्यांचा वैयक्तिक डेटा लोकांकडून घेत आहेत आणि वापरकर्त्यांना धमकावत आहेत. यापासून सावध राहावे, असे कंपनीच्यावतीने ग्राहकांना सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
व्होडाफोन-आयडिया बंद झाल्यास 28 कोटी ग्राहकांचे काय?; ‘या’ 8 मोठ्या बँका होणार प्रभावित
व्होडाफोन आयडिया बुडाली तर सरकारलाही 1.6 लाख कोटींचं नुकसान, जाणून घ्या कसं?