Shopping : उधारीवर शॉपिंग, फायदे एकापेक्षा एक, पण अटी माहिती आहेत का?
Shopping : आता उधारीवर शॉपिंग ही संकल्पना रुजू पाहत आहे, पण त्याचे फायदे आणि तोटही समजून घ्या..
नवी दिल्ली : देशात ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंगचे (Shopping) प्रचलन वाढले आहे. तर काही पेमेंट्स बँक आणि क्रेडिट कार्ड पुरवठादार ग्राहकांना आता बाय नाऊ, पे लेटर (Buy Now Pay Later) ही योजना सुरु केली आहे. त्याचा ग्राहकांना (Customer) अर्थातच फायदा होणार आहे. वेळेवर रक्कम नसली तरी ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.
बाय नाऊ, पे लेटर ( BNPL) योजनेचा खरा फायदा तरुण घेत आहेत. तरुणांमध्ये या योजनेबद्दल अधिक आकर्षण आहे. सणासुदीच्या काळात बाजारात गेल्यावर खरेदीवर काही अंकुश राहत नाही आणि प्रमाणापेक्षा अधिक रक्कम खर्च होते. पण खरेदी काही संपत नाही. अशावेळी ही योजना मदत करु शकते.
पण तुम्हाला माहिती आहे की बाय नाऊ, पे लेटर ही योजना आहे तरी काय? ही योजना कशी फायदेशीर ठरते त्याविषयी? तर BNPL योजना शॉपिंग करताना तुम्हाला छदामही न देता खरेदी करण्याची परवानगी देते.
या योजनेवर ठराविक कालावधीत रक्कम भरण्याची सुविधा देण्यात येते. हा कालावधी तुमच्यासाठी बिनव्याजी असतो. म्हणजे जेवढ्या रक्कमेची खरेदी केली. तेवढीच रक्कम तुम्हाला भरावी लागते.
पण ही तारीख उलटली तर तुम्हाला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागू शकतो. एवढेच नाही तर खरेदीदाराच्या क्रेडिट स्कोअरवरही त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे ठरलेल्या कालावधीतच तुम्हाला पेमेंट करणे आवश्यक असते.
अनेक कंपन्या, ऑनलाईन स्टोअर, अॅप तुम्हाला अटी व शर्तींसह Buy Now Pay Later ची सुविधा देतात. या सर्वांच्या अटी व शर्तीत फारसा फरक नसतो.
या अॅप, ऑनलाईन स्टोअरच्या माध्यमातून शॉपिंग केल्यानंतर BNPL या पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर तुमची तात्काळ केवायसी प्रक्रिया सुरु होते. तुमच्या क्रेडिट लिमिटनुसार आणि ठराविक काळाकरीता तुम्हाला ही सुविधा प्राप्त होते.
जर तुम्ही जास्त खर्चिक असाल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. पण याचा वापर योग्यरित्या आणि आवश्यक त्याठिकाणीच करणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते.
जर शॉपिंगपुरता तुमच्याकडे पैसा असेल तर BNPL चा पर्याय निवडण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण तुम्ही नाहक एखाद्या कंपनीचे कर्जदार व्हाल.
जर अगदोरच तुम्ही एखाद्या कर्जाचे हप्ते भरत असाल तर शक्यतो, बाय नाऊ, पे लेटर या सुविधेचा बिलकूल वापर करु नका. कारण हप्त्याचे गणित बिघडले तर भूर्दंड तर बसेलच पण सिबिल स्कोअरवरही परिणाम होईल.