Indian Railway : रेल्वे स्टेशनच्या नावामागे ‘रोड’ शब्दाचे गौडबंगाल काय? वापर होतो तरी कशासाठी
Indian Railway : रेल्वे स्टेशनच्या नावामागे रोड हा शब्द तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण त्यामागची ही गंमत तुम्ही कधी समजून घेतली आहे का, रेल्वे स्टेशनच्या नावामागे 'रोड' शब्दाचे गौडबंगाल काय? वापर होतो तरी कशासाठी?
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) ही अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. तर काही गोष्टी आपल्या माहिती नसल्याने अत्यंत रोचक, रंजक वाटतात. अनेक वेळा भारतीय रेल्वे काही संकेत, प्रतिकांचा, चिन्हांचा वापर करते. तुम्ही रेल्वेने प्रवास करताना अनेक असे रेल्वे स्थानकं पाहिले असतील, ज्यांच्या नावामागे रोड हा शब्द लिहिलेला आहे. तर काही रेल्वे स्थानकाच्या नावामागे हा शब्द नाही. त्यामुळे आपल्याही अनेकदा प्रश्न पडतो की रेल्वे स्टेशनमागे रोड (Road) हा शब्द लिहिण्यामागचे प्रयोजन तरी काय, ही एक सामान्य बाब वाटते. पण यामागे मोठा अर्थ दडलेला आहे.
का जोडण्यात येतो ‘रोड’ शब्द भारतीय रेल्वे स्थानकाच्या नावामागे रोड हा शब्द खास कारणासाठी लिहिण्यात येतो. त्यामागे माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्या रेल्वे स्थानकाच्या नावामागे रोड शब्द जोडण्यात येतो, ते रेल्वे स्टेशन शहरापासून दूर असते. तर काही रेल्वे स्थानकं अधिक दूर असतात. त्यासाठी प्रवाशांना रस्त्याचा वापर करावा लागेल, हे यातून स्पष्ट करण्यात येते. रेल्वे स्थानकाच्या नावामागे रोड शब्द जोडण्यात आल्याने मुख्य शहरापासून हे स्थानक दूर असल्याचे दिसून येते.
मुख्य शहरापासून अंतर भारतीय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अनिमेष कुमार सिन्हा यांनी याविषयी माहिती दिली. मुख्य शहरापासून रेल्वे स्थानक काही अंतरावर असेल तर ते दर्शविण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या नावामागे रोड हा शब्द जोडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा अर्थ या रेल्वे स्थानकापासून तुम्हाला मुख्य शहरात जाण्यासाठी रस्त्याचा वापर करावा लागेल, असा होतो, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
3 ते 100 किलोमीटरचे अंतर रेल्वे अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ज्या रेल्वे स्थानकाच्या मागे रोड लिहिलेले असेल तर मुख्य शहर या रेल्वे स्थानकापासून 3 ते 100 किलोमीटरचे अंतर असते. कोडाईकनाल रोड स्थानक मुख्य शहरापासून जवळपास 80 किलोमीटर दूर आहे. तर वसई रोड हे स्टेशन मुख्य शहरापासून जवळपास 3 किमी दूर आहे. रांची रोड रेल्वे स्टेशन हे रांची शहरापासून जवळपास 49 किमी दूर तर हजारीबाग रेल्वे स्थानक मुख्य स्थानकापासून जवळपास 66 किमी दूर आहे.
शहरापासून एवढे अंतर का? देशात रेल्वेचे मोठे जाळे आहे. दूरपर्यंत जायचे असेल तर रेल्वेचा स्वस्त पर्याय आहे. पण प्रत्येक शहराच्या अगदी जवळून रेल्वे लाईन टाकणे शक्य झाले नाही. त्यामुळे या शहरापासून काही अंतरावरुन ही रेल्वे स्थानक उभारण्यात आली. त्यामुळे डोंगर, दऱ्या, अथवा वाढीव खर्च टाळण्यासाठी सर्वांसाठी सहजसोप्या जागेची निवड करण्यात आली. त्या शहरातील प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ही स्थानकं जवळपास तयार करण्यात आली आहे.