चार्जिंग स्टेशन उभारल्यास मिळेल बक्कळ पैसा, जाणून घ्या व्यवसाय कसा सुरु कराल?
Electric Vehicles | विष्याच्यादृष्टीने पेट्रोलंपाप्रमाणेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा व्यवसायही फायदेशीर ठरू शकतो. आतापासून यामध्ये गुंतवणूक केल्यास आगामी काळात तुम्हाला फायदा होईल. या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला कमी खर्चात मोठा नफा देईल.
मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता आगामी युग हे इलेक्ट्रिक वाहनांचे असेल, अशी चर्चा हल्ली सर्रास कानावर पडते. इलेक्ट्रिक वाहने ही कमी प्रदूषण करणारी असल्याने सरकारकडूनही त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे भारतात आगामी दोन ते तीन वर्षांत इलेक्ट्रिक कारचा वापर वाढल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
त्यामुळे भविष्याच्यादृष्टीने पेट्रोलंपाप्रमाणेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा व्यवसायही फायदेशीर ठरू शकतो. आतापासून यामध्ये गुंतवणूक केल्यास आगामी काळात तुम्हाला फायदा होईल. या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला कमी खर्चात मोठा नफा देईल. EV चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. त्या लक्षात घेऊन तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडू शकता. पेट्रोल पंपासारखे चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी तुम्हाला सध्या परवान्याची गरज लागणार नाही.
चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी काय अटीशर्ती?
इलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सर्व संबंधित सबस्टेशन उपकरणांसह एक विशेष ट्रान्सफॉर्मर असावा. ज्यात प्लग-इन नोजल, 33/11 केव्ही केबल, सर्किट ब्रेकर असावा. चार्जिंग स्टेशनमध्ये किमान एक इलेक्ट्रिक कियोस्क असणे देखील आवश्यक आहे, ज्यामध्ये अनेक चार्जिंग पॉइंट्स असतील. तसेच गरजेनुसार ते वाढवता येतील.
लांब पल्ल्याच्या आणि अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर 100 किलोवॅटचे दोन चार्जर असणे आवश्यक आहे. तथापि, बससारख्या अवजड वाहनांसाठी, बस डेपोजवळील चार्जिंग स्टेशनला प्राधान्य दिले जाईल. जर तुम्हाला फास्ट चार्जर बसवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या चार्जिंग स्टेशनवर लिक्विड कूल्ड केबलचा वापर करावा लागेल. जेणेकरून वाहनाची बॅटरी चार्ज होईल.
इलेक्ट्रिक क्लिअरन्स गरजेचा
सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, आपल्याला विद्युत निरीक्षकाच्या मंजुरीची आवश्यकता असेल. या विद्युत निरीक्षकांची नियुक्ती स्थानिक वितरण कंपनीद्वारे केली जाते. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यापूर्वी, ते देखील तपासले जाईल. या व्यतिरिक्त, वाहन चार्ज करण्यासाठी दिलेल्या वेळेत ऑनलाइन बुकिंग सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन नेटवर्क सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा लागेल. चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी जमीन भाड्याने देखील घेतली जाऊ शकते. यासाठी आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. स्टेशनवर बसवलेली सर्व उपकरणे ISO प्रमाणित असणे आवश्यक आहे.
चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी किती खर्च येईल?
सार्वजनिक चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी, आपल्याकडे किमान 300 ते 500 चौरस फूट जागा असावी. जेणेकरून एका वेळी 2-3 कार सहजपणे चार्ज करता येतील. फास्ट चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी 16.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यात वीज, नागरी काम, देखभाल, चार्जिंग उपकरणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
जर तुम्ही तुमचे चार्जिंग स्टेशन 16 तास चालवले तर तुम्ही चौथ्यावर्षीच 3.5 रुपये प्रति युनिट दराने तुमचे भांडवल वसूल करू शकता. सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या राज्याच्या ऊर्जा विभागाशी संपर्क साधावा लागेल. याव्यतिरिक्त, तुम्ही टाटा पॉवर, डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स, इव्हॉल्ट, पॅनासोनिक सारख्या चार्जिंग स्टेशन स्थापित करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधू शकता.
संबंधित बातम्या:
पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!
इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार