Home Loan : बँकांचीच चालते मनमानी! असं चालखीने गंडवितात ग्राहकांना
Home Loan : गृहकर्ज घेताना बँका मनमानी करतात. नियमांच्या आडून, अटी व शर्तींच्या आडून बँका ग्राहकांना गंडवतात, कसे ते जाणून घेऊयात.
नवी दिल्ली : नोकरदार वर्गाला घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे घर उभं करताना त्यांना कोणत्या तरी बँकेचा दरवाजा ठोठवावाच लागतो. बँक खासगी असो की सरकारी, कर्ज देताना त्या हातच राखूनच देतात. गृहकर्ज (Home Loan) घेणे ही चाकरमान्याची आगतिकता असते. त्यावर बँका मात्र मालामाल होतात. प्रक्रिया शुल्क, छुपे शुल्क आणि व्याज, दंड अशा ही परिक्रमा ग्राहकाकडून चांगली वसूली झाल्याशिवाय थांबत नाही. गृहकर्जाचे व्याजदर तर सोडाच, पण आरबीआयने रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ केल्यानंतर ज्या झपाट्याने हप्ता वाढतो अथवा कर्जाचे वर्ष वाढतात, ते गृहकर्जदाराला सहन केल्याशिवाय पर्याय उरत नाही. तोंड दाबून बुक्याचा मार त्याला सहन करावा लागतो.
नफा कमविणे बँकांचे टार्गेट कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका, वित्तीय संस्थांचे एकच लक्ष्य असते, ते म्हणजे जरबदस्त नफा कमाविणे. ग्राहकाकडून जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याकडे त्यांचा ओढा असतो. बँका तुमच्या फायद्यासाठी कर्ज देतात, हा गैरसमज आहे. बँकांना त्यामाध्यमातून पुढील वीस वर्ष मोठा फायदा होतो.
विमा पॉलिसीचे गणित बँक तुम्हाला कर्ज देते. त्यानंतर आता बँक तुमच्या फायद्याचे गणित सांगत विमा पॉलिसी पण माथी मारते. बँक तुम्हाला कर्ज देते, त्यावर व्याज घेते. त्यानंतर बँका तुम्हाला टर्म इन्शुरन्स देतात. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कर्जाची त्यांना हमी मिळते. बँका त्यासोबतच कर्जासाठी एक गॅरटरची पण स्वाक्षरी घेते. कोर्टाच्या निकालानुसार, कर्ज घेणाऱ्यासोबतच त्याची हमी घेणाऱ्या हमीदाराकडून ही कर्जाची वसूल करता येते. त्यामुळे सर्वच बाजूंनी बँका निर्धास्त होतात.
बँकांची चालाखी बँका मोठ्या चालाखीने तुमच्या कर्जाच्या रक्कमेत विम्याची रक्कम जोडतात. या पॉलिसीसाठी तुम्हाला माफक खर्च येत असल्याची थाप ही वरतून मारतात. त्यासाठी गृहकर्जाच्या हप्त्यात विम्याचा 100 रुपयांचा हप्ता जोडण्यात येतो. कुटुंबाच्या चिंतेने अथवा भविष्यातील काळजीपोटी आपण विमा खरेदी करतो. विमा पॉलिसीच्या माध्यमातून बरेवाईट झाल्यास आपल्या कुटुंबियांना कुठलाच ताप राहणार नाही, यासाठी ही पॉलिसी खरेदी करण्यात येते.
अशी करतात फसवणूक समजा तुम्ही बँकेकडून 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यावर जोखीम नको म्हणून विमा संरक्षण घेतले. या विमा पॉलिसीचा सिंगल प्रीमियम अवघा 25 ते 30 हजार रुपये असतो. पण बँका याठिकाणी तुम्हाला गंडवितात. बँका तुमच्या मुळ रक्कमेत विमा पॉलिसीची रक्कम जोडतात. तुम्हाला विम्यापोटी दरमहा 100 ते 300 रुपयांपर्यंतचा हप्ता कपात होतो. तुमच्या मुळ कर्ज रक्कमेतच विम्याची रक्कम जोडल्यामुळे विम्याचा हप्ता पण 20 वर्षे सुरु राहतो. प्रतिमाह 300 रुपयांच्या हिशोबाने वार्षिक 3600 रुपये होतात. 10 वर्षांत ही रक्कम 36 हजार रुपये होते. तर 20 वर्षात ही रक्कम 72 हजार रुपयांवर पोहचते. म्हणजे बँका विम्यापोटीच तुम्हाला जवळपास 50 हजारांना गंडवितात. इतर छुपे शुल्क, प्रक्रिया शुल्क, रेपो रेट वाढीनंतरचे फटके याची तर गिणतीच नको.