पेट्रोल-डिझेलचा मूळ दर 40-50 रुपये प्रतिलीटर, तरीही इंधन इतके महाग का, जाणून घ्या सरकारची कमाई
Petrol Diesel | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमागे अनेक कारणे दिली जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे मूल्य इत्यादी कारणे आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे त्यावर लागणारा कर हेदेखील प्रमुख कारण आहे.
मुंबई: देशभरात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने चिंतेचे वातावरण आहे. पेट्रोल आणि डिझेल दररोज किंमतीचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहेत. देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.46 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.59 आणि 96.32 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत का वाढते?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमागे अनेक कारणे दिली जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे मूल्य इत्यादी कारणे आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे त्यावर लागणारा कर हेदेखील प्रमुख कारण आहे. कर वजा करायचा झाला तर पेट्रोलची मूळ किंमत अवघी 44 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचीही मूळ किंमत 45 ते 46 रुपये प्रतिलीटर इतकी आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे इंधनाची किंमत जवळपास दुपटीने वाढते.
केंद्र आणि राज्य नक्की कोणता कर लावतात?
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत इंधनावरील कर आणि शुल्क यांचा मोठा वाटा आहे. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही कर आकारतात. याशिवाय, मालवाहतूक, डीलर शुल्क आणि डीलर कमिशन देखील त्याच्या किंमतीत समाविष्ट आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किमतीत हे सर्व जोडल्यानंतर किरकोळ किंमत निश्चित होते.
पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते, जे भारतभर एकसमान आहे. मात्र, व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. देशात राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ
गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2014 मध्ये पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 9.48 रुपये होते. आता हे शुल्क 33 रुपये प्रति लिटर झाले आहे. त्याचबरोबर 2014 मध्ये डिझेलवर उत्पादन शुल्क 3.56 रुपये प्रति लीटर होते, जे आता वाढून सुमारे 32 रुपये प्रति लीटर झाले आहे.
संबंधित बातम्या:
Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?