महिला आर्थिक निर्णय घेण्यात मागे का पडतात?, जाणून घ्या आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व
आज महिला घराचे संपूर्ण बजेट सांभाळतात, काटकसरीने संसार करतात. मात्र तरी देखील अनेक महिला या आर्थिक निर्णय घेऊ शकत नाहीत. जाणून घेऊयात त्या पाठीमागील कारणे
एका खासगी शाळेत वंदना शिक्षिका म्हणून काम करते. पगार कमी मिळत असल्यानं घरी शिकवणी वर्गही चालवते. नोकरी आणि ट्युशनच्या (Tuition) माध्यमातून वंदना महिन्याकाठी 50 हजार रुपये कमावते. कमावलेली रक्कम केंव्हा, कुठे आणि कशी गुंतवणूक (Investment) करावी याचे सर्वाधिकार मात्र तिच्या नवऱ्याकडे आहेत. आज महिलांनी (Women) जवळपास सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलीये. कामाच्या बाबतीत त्यांची कामगिरी पुरूषांपेक्षाही चांगली आहे. विशेषत: नोकरदार महिला आपल्या घरातील कामासोबतच ऑफिसमधील कामही उत्तमरितीनं पार पाडतात. त्यामुळे शिक्षण, बँकिंग आणि आयटीसारख्या क्षेत्रात महिलांचा टक्का वाढलाय. डिलोलाईटच्या अहवालानुसार भारतातील कंपन्यांच्या संचालक मंडळात महिलांची संख्या 17.1 टक्क्यांवर पोहोचलीये. 2014 मध्ये संचालक मंडळात महिलांची संख्या फक्त 9.4 टक्के होती. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात स्त्रियांचा मोठा वाटा असल्यानं त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. बहुतांश महिला मेहनती आणि कुशल असूनही आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देत नाहीत. फिडेलिटी सर्वेक्षणानुसार, 86 टक्के महिला गुंतवणुकीचे निर्णय स्वत: घेणं टाळतात. बहुतेक महिला गुंतवणूक करताना कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा आर्थिक सल्लागारांवर अवलंबून असतात. यामुळे त्यांना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
घराच्या बजेटची जबाबदारी महिलांवर
घराचं बजेट सांभाळण्यात महिला तरबेज आहेत. अंत्यत कमी पैशात महिला घरखर्च भागवतात याबाबतीत त्या पुरुषांपेक्षा सरस आहेत. मात्र, गुंतवणुकीच्या बाबतीत त्या का आत्मनिर्भर होत नाहीत? बहुतांश महिला जोखीम घेणं टाळतात,असं अहवालातून दिसून आलंय. यामुळे महिला गुंतवणूक करताना बँक एफडी, सोनं,पोस्टातील आरडी, बॉण्ड, आयुर्विम्यासारखे सुरक्षित पर्याय निवडतात. सुरक्षित गुंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाईवर मात करण्यात सक्षम नाही. भांडवली बाजारात आता गुंतवणुकीसाठी अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. कमी जोखीम घेऊन चांगला परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आता महिला पुढे येत आहेत. पण देशातील एकूण महिलांच्या लोकसंख्येचा विचार करता अशा महिलांची संख्या नगण्य आहे. गुंतवणुकीसंदर्भात महिलांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी कंपन्यांनी बाजारात विविध योजना आणाव्यात, असा सल्ला आर्थिक सल्लागार जितेंद्र सोळंकी यांनी दिलाय.
कॅपिटल मार्केटमध्ये महिलांसाठीच्या योजनांचा अभाव
कॅपिटल मार्केटमध्ये महिलांसाठी कोणतीही विशिष्ट योजना नाहीत असे जितेंद्र सोलंकी सांगतात. तसेच एचडीएफसी लाइफने महिलांसाठी विशेष विमा पॉलिसी सुरू केलीये. म्युच्युअल फंडात महिलांसाठी खास योजना आणल्यास महिलांमध्ये गुंतवणुकीचा आत्मविश्वास वाढू शकतो. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ध्येय स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे. बचत आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात तर हा मंत्र खूपच महत्त्वाचा आहे. महिला घरातील बजेटचं नियोजन उत्तमरितीनं पार पाडतात. आर्थिक नियोजनाची ही पहिली पायरी आहे. मासिक खर्च भागवल्यानंतर उर्वरित पैशांची गुंतवणूक करावी. गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी खूप भांडवल लागत नाही. एक हजार रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करता येते. जीवनात आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी कमाईसोबतच गुंतवणूकीलाही प्राधान्य द्या. सहसा महिला घरातील खर्च सांभाळतात आणि पुरुष गुंतवणुकीचे निर्णय घेतात.जर दोन्ही कामं महिला आणि पुरूषांनी एकत्रितपणे केल्यास खूप फायदा होऊ शकतो. महिला आणि पुरुषाच्या एकत्रित विचारातून बचतीसाठी एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते.