मायक्रोवेव्हमध्ये ओव्हनमध्ये अन्न गरम होतं, मग भांडी का नाही? हे जाणून घ्या!
गॅसवर काही गरम केलं की आधी भांडं तापतं, पण मायक्रोवेव्हमधून कडकडीत गरम जेवण बाहेर येतं, पण ते ज्या काचेच्या बाऊलमध्ये ठेवलंय, ते मात्र हाताला चटका देत नाही! असं का होतं? चला, समजून घेऊया की मायक्रोवेव्ह नक्की कसं काम करतं आणि का ते भांड्याला नाही, तर थेट अन्नाला गरम करतं!

साधारणपणे, गॅसवर अन्न गरम करताना आधी भांडी तापतात, त्यानंतर त्यातलं अन्न गरम होतं. पण, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अनेकदा उलटं दिसून येतं. अन्न गरम होतं, पण त्या काचेच्या किंवा सिरॅमिक भांड्यांना अगदी थोडं कोमट होतं. हे थोडं विचित्र वाटतं, नाही का? पण मायक्रोवेव्ह ओव्हनच्या कार्यपद्धतीमधील एक मूलभूत फरक आहे, ज्यामुळे हे घडतं.
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये उष्णता तयार करण्यासाठी गॅसच्या प्रमाणे अगदी साधारणत: आगीचा वापर किंवा गरम कॉइल्स वापरले जात नाहीत. याऐवजी, मायक्रोवेव्ह ‘मायक्रोवेव्ह ऊर्जा लहरी’ वापरतो. या विशिष्ट लहरींचं एकच लक्ष्य असतं ते म्हणजे अन्नातील पाण्याचे रेणू. बहुतेक अन्नात पाण्याचा अंश असतो, आणि मायक्रोवेव्हमध्ये असलेला ‘Magnetron’ या लहरी तयार करतो आणि त्या लहरी थेट अन्नातील पाण्याच्या रेणूंना शोधतात.
अन्न आतून कसं गरम होत?
मायक्रोवेव्ह ऊर्जा लहरी पाण्याच्या रेणूंवर आदळताच, त्या रेणूंच्या घडामोडी खूप वेगाने सुरू होतात. अशा वेगाने हालणाऱ्या रेणूंमध्ये घर्षण निर्माण होतं, आणि याच घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. ही उष्णता अन्नाच्या आत, जिथे पाणी आहे तिथे तयार होऊन अन्न वेगाने गरम होतं.
मग भांडी थंड का राहतात?
आता प्रश्न असा आहे की, मायक्रोवेव्हमध्ये वापरणाऱ्या भांड्यांमध्ये पाण्याचा अंश असतो का? नाही! किंवा अगदी नगण्य असतो. म्हणून, मायक्रोवेव्हच्या ऊर्जा लहरी या भांड्यांमधून सरळ आरपार जातात आणि त्या लहरींनी त्या भांड्यांना तापवलेलं नाही. यामुळे, मायक्रोवेव्हची ऊर्जा त्या भांड्यांना एक प्रकारे प्रभावित करत नाही. त्यामुळे, मायक्रोवेव्हमधील लहरींना त्या भांड्यांचं अस्तित्व जणू नाहीच असं वाटतं.
तरीही भांडी किंचित गरम का होतात?
कधी कधी, भांडी थोडं गरम होतात. याचं कारण म्हणजे आतलं अन्न प्रचंड गरम झालेलं असतं. त्या गरम अन्नाची उष्णता भांड्याला लागून थोडी गरम होते. ही उष्णता मायक्रोवेव्हमधून आलेली नसून, त्या गरम अन्नापासून आलेली असते.
मायक्रोवेव्हमध्ये धातू का चालत नाही?
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये धातूच्या वस्तू वापरणं धोकादायक ठरू शकतं. स्टीलची किंवा ॲल्युमिनियम फॉईलची वस्तू ठेवली तर, मायक्रोवेव्हच्या लहरी त्या धातूवर आदळून ठिणग्या उडवू शकतात. यामुळे आपला मायक्रोवेव्ह खराब होऊ शकतो किंवा आग लागण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून, ‘Microwave Safe’ लेबल असलेली भांडीच वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे.