प्राप्तिकर बचतीचे ‘स्मार्ट’ मार्ग : कमाई 10 लाख, कर 0; आकडेमोडीसह विश्लेषण
तुम्हाला त्यासाठी खर्च आणि बचत यामध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला वार्षिक 10 लाख 50 हजार उत्पन्नावर एक रुपयाचाही आयकर भरावा लागणार नाही.
नवी दिल्ली– केंद्र सरकारने उत्पन्ननिहाय कर संरचना निर्धारित केली आहे. वित्तीय वर्षाअखेर कर अदा करणे करदात्यांचे दायित्व ठरते. मात्र, गुंतवणूक, देणगी, प्रमाणित कपात यासारख्या मार्गाने करपात्र उत्पन्न घटविण्याचे कायदेशीर मार्गही आहेत. आयकर नियमानुसार दहा लाखांवरील उत्पन्नावर 30% कर अदा करावा लागतो. तुम्ही सुयोग्य गुंतवणूक आणि आयकर सवलतीद्वारे तुमची वार्षिक कर देय रक्कम शून्यावरही आणू शकतात.
तुम्हाला त्यासाठी खर्च आणि बचत यामध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख 50 हजार रुपये असल्याचे गृहित धरुया. आमच्या प्राप्तिकर बचतीच्या धोरणानुसार तुम्हाला एकही रुपयांचा कर द्यावा लागणार नाही. नेमकं गणित कसं जाणूय घेऊया आकडेमोडीसह-
प्रमाणित कपात (Standard deduction) : प्रमाणित कपातीवर पन्नास हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळते. सर्वप्रथम तुमच्या उत्पन्नातून प्रमाणित कपात वजा करा. तुमच्या उत्पन्नातून पन्नास हजार रुपयांच्या प्रत्यक्ष कपातीनंतर दहा लाख रुपये करपात्र उत्पन्न होते.
तुम्ही कलम 80-सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांची बचत करू शकतात. तुम्हाला भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन स्कीम यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. तसेच तुम्हाला दोन्ही मुलांचे ट्यूशन शुल्क 1.5 लाखापर्यंत करमुक्त आहे. तुमच्या करपात्र उत्पन्नात दीड लाख रुपयांची घट होऊ शकते. (10,00,000- 1,50,000= 8,50,000 रुपये) तुमचे वजावटीनंतर करपात्र उत्पन्न 8.5 लाख झाले.
तुमची नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत वार्षिक 50 हजारांची गुंतवणूक आयकर कायद्यानुसार कर वजावटीस पात्र ठरते. त्यामुळे तुमच्या करपात्र उत्पन्नाची मर्यादा (8,50,000-50,000= 8,00,000 रुपये) आठ लाखांवर पोहोचते.
गृह कर्ज घेणाऱ्या करदात्यांना 2 लाखांची सूट मिळते. आयकर नियमानुसार दोन लाखांपर्यंतचे व्याज करवजावटीस पात्र ठरते. तुमच्या वार्षिक उत्पन्नातून दोन लाखांची व्याज रक्कम वजा केल्यास तुमचे करपात्र उत्पन्न 6 लाखांवर पोहोचते. (8,00,000-2,00,000= 6,00,000 रुपये)
आयकर अधिनियम 80 D अंतर्गत, तुम्ही मेडिकल पॉलिसी घेऊन 25 हजारांपर्यंतची सवलत प्राप्त करू शकतात. हेल्थ चेक-अप खर्चासह पॉलिसी प्रीमियम साठी 25 हजारांपर्यंतची कपात मिळवू शकतात. तुमचे आई-वडील ज्येष्ठ नागरिक असल्यास त्यांच्या नावे हेल्थ पॉलिसी काढून 50 हजार रुपयांपर्यंतची सवलत प्राप्त करू शकतात. तुमचे वजावटीनंतर करपात्र उत्पन्न 5, 25, 000 रुपयांवर पोहोचते. (6,00,000- 75,000= 5,25,000)
तुम्ही धर्मादाय कार्य करण्याद्वारे करपात्र रकमेत कपात करू शकतात. कोणत्याही धर्मादाय संस्थेत आयकर अधिनियम 80-सी अंतर्गत केलेली 25 हजार रुपयांपर्यंतची देणगी कर वजावटीस पात्र ठरते. तुमचे करपात्र उत्पन्न पाच लाखांवर पोहोचते. (5,25,000-25,000= 5,00,000)
आयकर अधिनियमानुसार, 5 लाख रुपयांच्या कमाईवर कर रुपात 12, 500 आकारले जातात. मात्र, आयकर नियम 87A अंतर्गत 12500 रिबेट स्वरुपात मिळतात. तुम्हाला शून्य रुपये रक्कम कररुपात अदा करावी लागते.