Pahalgam Attack : माणुसकीचं जीवंत उदाहरण… पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच…
पेहेलगाममध्ये धर्मविचारून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला आणि यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. ही एक बाजू असली तरी इथल्या स्थानिक काश्मिरी मुसलमानांनी जीवाची बाजी लावून पर्यटकांना सुखरूप ठेवलेलं होतं.
पेहेलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांशी आदिल नावाच्या शूरवीराने दोन हात केले. यात बैसरनमध्ये पर्यटकांना घेऊन येणाऱ्या आदिल सय्यद हुसैन शहाचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा आदिल हुसैन शहाने विरोध केला आणि थेट रायफल हिस्कवण्याचा प्रयत्न करत दहशतवाद्यांशी भिडला. यात संतापलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून आदिलचा जीव घेतला.
आदिल गेला आता घर कोण चालवणार?
आदिल हुसैन हा बैसरन परिसरामध्ये पर्यटकांना घोड्यावरून फिरवण्याचं काम करायचा. आदिलच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आदिल घरातील एकमेव कमावता पुरूष होता. त्यामुळे आदिलच्या जाण्याने आधारच नाहीसा झाल्याचं त्याचे कुटुंबीय सांगताहेत. मुलागा आदिल गेला आता घर कोण चालवणार? यानंतर एकनाथ शिंदेंनी त्याच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं.
सज्जादने जखमींना पाणी दिलं आणि..
पेहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना मदत करणाऱ्या अनेकांची नावं समोर आली आहेत. त्यापैकी सज्जाद अहमद भट्टचं नाव देखील सांगितलं जातंय. सज्जाद अहमद भट्ट हा स्थानिकांसोबत संकटात सापडलेल्या पर्यटकांना मदतीसाठी पोहोचला. सज्जादने जखमींना पाणी दिलं आणि घोड्यावर बसून मदत केली.
नजाकतने 11 पर्यटकांचे प्राण वाचवले
पेहेलगाममध्ये छत्तीसगडच्या चिरीमिरीतील चार कुटुंब हल्ल्यावेळी उपस्थित होती. याच वेळी स्थानिक रहिवासी नजाकत अहमद शहाने स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बचावलेले भाजपा नेते अरविंद अग्रवाल यांनी फेसबुकवर पोस्ट करत नजाकत अलीचे आभार मानले आहेत. नजाकत अहमद शहा यांनी एक दोन नाही तर तब्बल 11 पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक

नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य

400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं

आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
