सात वर्षानंतरही त्यांच्या डोळ्यातले अश्रू तसेच, आता दिला आमरण उपोषणाचा इशारा
नगरमधून केस औरंगाबादला गेली, आता मुंबईला गेली. पण त्याची माहिती कुणीच दिली नाही. गेली 7 वर्ष आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो. त्याला क्षमा नाही. जर चार दिवसात न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करू....
अहमदनगर, कोपर्डी : : 6 सप्टेंबर 2023 | 7 वर्षानंतरही अजून आम्हाला न्याय मिळाला नाही. नगर जिल्हाकोर्टात निकाल लागला. त्यानंतर ती केस औरंगाबाद कोर्टात गेली. वकील काही सांगत नाही, फोन उचलत नाहीत, आता केस मुंबईला गेल्याचे सांगतात. सध्या त्या केससंदर्भात आम्हाला कुठलीच माहिती नाही. मुख्यमंत्री यांना भेटलो. त्यांनी एका वकिलाची भेट घालून दिली. पण ते ही फोन घेत नाहीत. आता दोन दिवसांनी मुख्यमंत्री यांच्याकडे जाणार आहे. जो माझ्या मुलीवर अन्याय झाला तो अन्य कुणावर होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. येत्या 4 दिवसात न्याय न मिळाल्यास माझ्या मुलीच्या समाधी स्थळावर आमरण उपोषण करणार असा इशारा कोपर्डी घटनेच्या पीडित कुटुंबाने दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेले नऊ दिवस उपोषण करत आहेत. सरकारने त्यांना चार दिवसांची वेळ दिली आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही आमचीही मागणी आहे. आमच्यावर जो अन्याय झाला तो अन्य कुणावर होऊ नये असे सांगताना त्यांचे अश्रू अनावर झाले.