राज ठाकरे यांच्या भाषणानंतर ‘मनसे’कडून मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या ‘त्या’ कंपनीची तोडफोड
VIDEO | पनवेलमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'त्या' भाषणानंतर मनसे आक्रमक, मुंबई- गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या चेतक सन्नी कंपनीची मनसैनिकांकडून तोडफोड
पनवेल, १८ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मुंबई गोवा महामार्गाच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा मुद्दा त्यांनी उचलला. मुंबई गोवा महामार्ग गेल्या 17 वर्षांपासून रखडलेला असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यानंतर मनसैनिकांकडून आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. मुंबई- गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी माणगावमधील चेतक सन्नी नावाच्या कंपनीचं कार्यालय मनसेकडून फोडण्यात आलं. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पनवेल मधील भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पनवेलच्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, “आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?”, असंही राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं.