वेदांता प्रकल्प शिंदे सरकारने गुजरातला पळवला; खापर ‘मविआ’वर फोडलं, अंबादास दानवेंचा जोरदार हल्लाबोल
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदांता प्रकल्प गुजरातनं पळवला, यासाठी शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार असल्यांच त्यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून देखील आधीच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. आता याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातनं (Gujarat) पळवला, यासाठी शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार आहे. मात्र या प्रकल्पाचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडण्यात येत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. शिंदे गटाकडून उपनेत्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 26 जणांची नावे आहेत. मात्र औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना उपनेत्यांच्या यादीमधून देखील वगळण्यात आले आहे. यावरून दानवे यांनी शिरसाट यांना टोला लगावला आहे, शिरसाट हे उपनेत्यांपेक्षा मोठे नेते असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.