सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत शिंदेंकडून थेट अल्टिमेमट
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी माहीम विधानसभा मतदारसंघाची ओळख असून यंदा निवडणुकीत मनसेकडून माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच महाविकासाआघाडीत ठाकरे गटाकडून महेश सावंत हे ही निवडणूक लढवणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकर यांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना विधानपरिषदेची ऑफरही देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात साधारण 2 तास चर्चा झाली. सदा सवणकरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना सूचना दिल्याची माहिती मिळतेय. तर माझ्या मतदारांनी मला विधानसभा लढण्यास सांगितले आहे. या भूमिकेवर ठाम असून सदा सरवणकर आपली उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम असल्याचेही सूत्रांकडून कळतंय. सदा सरवणकरांना शिंदेंकडून विधान परिषदेची ऑफरही देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सरवणकर किंवा त्यांच्या मुलीला शिवसेनेमार्फत विधान परिषद मिळेल, अशी ऑफरही दिली. येत्या 4 तारखेपर्यंत योग्य तो निर्णय घ्या, उमेदवारी अर्ज मागे घ्या असा अल्टिमेमट एकनाथ शिंदेनी सरवणकरांना दिल्याचं समजतंय. पण माझ्यावर माझ्या मतदारांचा दबाव आहे, कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नये, मतदारांनी मला लढायला सांगितलं आहे, असे सरवणकर म्हणालेत. त्यामुळे माहिममधील पेच आता वाढला असून नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.