“शरद पवार यांनी आपल्या शिष्याची कानउघाडणी करावी”, पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी मागणी मविआच्या नेत्यांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार जाणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी मागणी मविआच्या नेत्यांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्या व्यक्तीमुळे या देशाची संविधान, लोकशाही आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना धोका पोहोचला आहे. अशा व्यक्तीच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी उपस्थित न राहिलेलं बरं. पण याआधी पुण्यात नरेंद्र मोदींनी स्वत: शरद पवारांना गुरू म्हटलं होतं. मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींची कानउघडणी त्यांनी करावी.शरद पवारांनी उद्या पुण्यात आपल्या शिष्याचे कान पकडून तुम्ही जे करत आहात ते लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे, अशा पद्धतीची कानउघडणी करावी, अशी आमची विनंती आहे.”