राजकारणात शत्रू, ग्राउंडवर मित्र, खासदार श्रीकांत शिंदे औरंगाबादेत ‘या’ मित्रासोबत एकत्र!
आम्ही दोघांनीही आमच्या मैत्रीवर राजकारण हावी होऊ दिलं नाही, अशी प्रतिक्रिया खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
कुणाल जायकर, औरंगाबादः राजकारणात कट्टर विरोधक असलेले अनेक दिग्गज एरवी एकत्र येऊ शकतात, सामान्यांप्रमाणे एकत्रितपणे हसू-बोलू शकतात. हे चित्र थोडं विरळच दिसून येतं. पण औरंगाबादेत नुकतंच असं दृश्य दिसलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे दोघं एकत्र आलेले दिसून आले.
निमित्त होतं खा. इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या फेस्टिवलचं.. खा. श्रीकांत शिंदे यांची काल सिल्लोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी इम्तियाज जलील यांच्यासोबत क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला.
त्यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ आम्ही मित्र आहोत. हा कुठल्या पक्षाचा मंच नव्हता. दोघांचा पक्ष आणि विचारसरणी वेगळी आहे. पण प्रत्येक गोष्टीत पक्ष आणला नाही पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती आहे. राजकारण एका ठिकाणी आणि मैत्री वेगळ्या ठिकाणी, अशी
सध्याच्या राज्याची परिस्थिती आहे. राजकारणाची पातळी घसरली आहे. राजकारण एका बाजूला आणि विकासाची बाब येते, तेव्हा एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आम्ही दोघांनीही आमच्या मैत्रीवर राजकारण हावी होऊ दिलं नाही, अशी प्रतिक्रिया खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
क्रिकेटसामान्यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया पहा-
श्रीकांत शिंदे यांनी काल सिल्लोड येथील सभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली. सत्ता असताना तुमचे वडील घरातून बाहेर निघत नव्हते आणि तुम्ही पर्यावरणमंत्री असताना विदेशात पर्यटन केलं. आता सत्ता गेल्यानंतर बांधावर जायचं नाटक सुरु आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.
अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात- सिल्लोड येथे काल श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमीपूजन झालं. त्यानंतर संध्याकाळी नगर परिषद प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली.