‘दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, महायुतीचा उमेदवार असताना घड्याळाचा AB फॉर्म आला कसा? जसं काय ट्रम्पच्या पक्षाचा…’, कोणाचा खोचक टोला
भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपा, अजित पवार गट, शरद पवार गट आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे अशी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुती अन् मविआ नेत्यांकडून प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळतोय. अशातच बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी महायुतीमध्ये सामील असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर सुरेश धस यांनी निशाणा साधला आहे. आष्टी मतदारसंघात घडाळ्याचे बारा वाजलेत, छोट्या पवारांचे काहीच चालत नाही. मात्र मोठ्या पवारांचे चालते, माझे महायुतीकडून तिकीट जाहीर झाले असताना देखील घड्याळाचा एबी फॉर्म आला कसा? असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केलाय. यासह केवळ मला रोखण्यासाठी हे सुरू असल्याचं धस यांनी म्हटलं असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला भाजपा आणि अजित पवार गटाची मैत्रीपूर्ण लढत म्हटलं जात होतं. मात्र निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर सुरेश धस यांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात असून माझी लढत मात्र शिट्टीशी आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलंय.