Beed Constituency : बीडमध्ये दुर्दैवी घटना, मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू अन् कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?
बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला आहे. आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आणि एकच खळबळ उडाली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं निधन झालं.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यापासून बीड मतदारसंघाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाली. मात्र आज बीड जिल्ह्यातील काही ठाकणी राडा झाला तर दुसरीकडे लोकशाहीच्या उत्सवात दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला आहे. आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आणि एकच खळबळ उडाली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं निधन झालं. बीड विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज मतदानाच्यादिवशी बाळासाहेब शिंदे हे बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आल्यासारखे झाले आणि ते खाली कोसळले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांना त्वरीत बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र पुढील उपचारांसाठी त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल कऱण्यात आले पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि हा प्रकार समोर आला.