‘या’साठीच हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभागी, चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितले
हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्यामागे कोणतेही पक्षीय राजकारण नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे. हिंदू जनआक्रोश मोर्च्याला आज शिवाजी पार्क मैदानातून सुरूवात झाली. तर हा मोर्चा परळच्या कामगार मैदानावर जाऊन धडकणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. हातात भगवे झेंडे, अंगात भगवे कपडे घालून हजारो लोक शिवाजी पार्कात एकवटले आहेत. या मोर्च्यात भाजप नेत्यासह शिंदे गटही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लव्ह जिहाद रोखण्यासाठी आणि धर्माच्या एकजुटीसाठीच हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभागी झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.
सर्व हिंदू आणि हिंदूत्ववादी संघटना या मोर्च्यात एकवटले आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. या सहभागात कोणताही राजकीय हेतू, पक्षीय राजकारण नसल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.