भाजप खासदाराचा लाडक्या बहिणींना दम, ‘आमचे 1500 घ्यायचे अन् काँग्रेसच्या रॅलीत, त्यांचे फोटो काढा, आम्ही त्यांची…’
आपले १५०० रूपये घेऊन काँग्रेसच्या रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, त्या महिलांचे फोटो आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असा इशारा देत राज्यातील लाडक्या बहिणींनाच एकप्रकारे धनंजय महाडिकांनी दमच दिल्याचे पाहायला मिळतंय. तर आम्हाला पैसे नको म्हणून अनेक जण पैसे घेतायंत, असं धनंजय महाडिक म्हणालेत.
आमचे पैसे घेऊन विरोधकांचे गुणगाण चालणार नाही, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यातील लाडक्या बहिणींनाच दमदाटी केली आहे. ‘जर इथं काँग्रेसची रॅली निघाली. त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या. ज्या आपल्या योजनेचे 1500 रूपये घेतात. त्यांचे फोटो काढून घ्या. फोटो काढा त्यांची नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गुणगान त्यांचं गायचं त्यांचं असं नाही चालणार. काही लोक छाती बडवताय. आम्हाला नको पैसै… आम्हाला नको पैसै आम्हाला सुरक्षा पाहिजे, असं म्हणत होते. पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं? काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडं द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो’, असं धनंजय महाडिक म्हणालेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा एक भाषणातील व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. तर कोल्हापूरमधील एका सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून एक विधान केलं. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांच्याकडून देण्यात आलं आहे.