उबाठाच्या ‘त्या’ पोपटांनी संपत चाललेल्या पक्षाची चिंता करावी आणि…, राऊतांवर कुणाचा रोख?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावललं जात असल्याची टीका केली जात आहे. यावर भाजप नेते, आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रतिक्रिया देत थेट उबाठा गटासह ठाकरे गटाचे खासदार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय
नागपूर, ६ मार्च २०२४ : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावललं जात असल्याची टीका केली जात आहे. यावर भाजप नेते, आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रतिक्रिया देत थेट उबाठा गटासह ठाकरे गटाचे खासदार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. ज्या पक्षाचे तीन तेरा होऊन गेले असता यंदाच्या निवडणुकीत एक तरी जागा निवडून येणार की नाही यात शंका आहे. कारण हिंदूत्व सोडून त्यांनी हिरवा झेंडा हातात घेतलाय. त्यामुळे संजय राऊत यांच्यासह उबाठाच्या पोपटांनी आपल्या संपत चाललेल्या पक्षाची चिंता करावी, नितीन गडकरी यांची चिंता करु नये’, असे प्रत्युत्तरच उबाठाला त्यांनी दिलं आहे. तर “लोकसभा निवडणूकीत नागपूरात नितीन गडकरी हेच भाजपचे उमेदवार असतील. नाना पटोले, संजय राऊत या सकाळच्या पोपटांनी आमची चिंता करु नये. नागपूरातून फक्त केंद्रीय मंत्री यांचं नाव एकमताने उमेदवारीसाठी पाठवलंय”, असे म्हणत नितीन गडकरी यांनी नागपूरचा कायापालट केला आहे त्यामुळे तेच आमचे नेते आहेत, असे म्हणत भाजप नेते आमदार कृष्णा खोपडे यांनी संजय राऊत यांना थेट उत्तर देत निशाणा साधला आहे.