Sangli | कुलूप घालून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार गोपिचंद पडळकरसह 71 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 71 एसटी कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी बस डेपो आणि वर्कशॉपला एसटी कर्मचाऱ्यांनी टाळं ठेकलं राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. आटपाडी बस डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 71 एसटी कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी बस डेपो आणि वर्कशॉपला एसटी कर्मचाऱ्यांनी टाळं ठेकलं राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. आटपाडी बस डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. एसटी महामंडळाचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा, या मागणीसाठी पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांनी बस डेपो आणि वर्कशॉपला कुलूप घातल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ पडळकरांचा नारा
राज्यातील एसटी कर्मचारी तुपाशी व्हायचा असेल तर “युनियन मुक्त कर्मचारी” गरजेचा असल्याचं भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. राज्याच्या अनेक एसटी कर्मचारी संघटनांकडून कोट्यावधी रुपये एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून घेतले जातात. युनियनमधील पदाधिकाऱ्यांची मुलं परदेशी शिक्षण घेतात. तर एसटी कर्मचारी आणि त्याचे कुटुंब मात्र उपाशी आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ हा आपला नारा असल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलंय.
एसटी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. “जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचारयांना” ही आपली भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे, अशी मागणी पडळकर यांनी केलीय. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा आणि सरकार हा निर्णय घेणार नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांनीही आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांचा आसूड घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, असं आवाहन पडळकर यांनी केलं होतं.