Suresh Dhas : बीडमध्ये आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्…, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर नाव न घेता निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर तुरूंगात असतनाही वाल्मिक कराडची टोळी कार्यरत असल्याचा आरोपही धसांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील आवादा कंपनीत तब्बल १२ लाखांची चोरी करण्यात आली. या चोरीच्या घटनेनंतर आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या चोरीच्या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणतरी भुरटे चोर असतील. आवादा कंपनीने पुढे येऊन यासंदर्भात माहिती दिली पाहिजे. आकाच्या सहकाऱ्यांना यापूर्वी सवयी लावलेल्या आहेत. इकडून नाही मिळालं तर आकाच्या लोकांनीच अशा चोऱ्या करायच्या. सुरक्षारक्षकांचे हात-पाय बांधल्यानंतर आता ते काय करणार? यांची अजूनही डोकी जागेवर नाहीत’, असं म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा चोरीच्या घटनेवर बोलताना आकाचा उल्लेख केला. तर एका दलित समाजाच्या वॉचमेनला मारहाण करण्याच्या नादात खंडणी प्रकऱणात बीडमध्ये मोठी घटना घडली आहे. तरी देखील अद्याप डोकं जागेवर नाही. आकाच्या कोणीतरी सहकाऱ्याने हे केलं असणार आणि दोन-चार दिवसात चोरी करणारे सापडतील त्यात शंभर टक्के हेच लोकं असणार असं म्हणत सुरेश धसांनी आकाच्या टोळीवर निशाणा साधलाय. बीड जिल्ह्यात आकाची टोळी अद्याप कार्यरत आहे, असं म्हणत सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर जोरदार निशाणा साधलाय.