तुम्ही वाटच बघत होतात का? आव्हाडांचा भाजपला खोचक सवाल
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही जगदीश मुळीक यांना फैलावर घेत ट्विट केले आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन काहीच दिवस झाले आहेत असे सुनावले आहे
ठाणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाला काही तास उलटत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही पोटनिवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार असे पोस्टर्स दिसत आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जगदीश मुळीक यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही जगदीश मुळीक यांना फैलावर घेत ट्विट केले आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन काहीच दिवस झाले आहेत. त्यांच्या निधणाचे 10 दिवसांचे सुतक तर संपु द्या मग लावा बॅनर. का तुम्ही याचीच वाट बघत होतात? म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळे पणा असे खडे बोल सुनावले आहेत.