Central Railway : बदलापूर रेल्वे स्थानकावर रोजच चेंगराचेंगरी ! होम प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांचा संताप, एकच केली मागणी?
बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक कायमचा बंद जरी होणार असला तरी रेल्वे प्रवाशांसाठी दुसरा पर्याय रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र यामुळे प्रवाशांमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या मोठ्या गर्दीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या आठवडाभरापासून बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक कायमचा बंद करण्यात आला असून प्लॅटफॉर्म नंबर एक ऐवजी आता १-ए या प्लॅटफॉर्मवरून लोकल ट्रेन सोडण्यात येत आहेत. मात्र बदलापुरात होम प्लॅटफॉर्म असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहेत. प्लॅटफॉर्म १ बंद असल्याने प्रवाशांची होम प्लॅटफॉर्मवर गर्दी होत असून अपुऱ्या नियोजनामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होत आहेत. यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. अशातच या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बदलापूर स्थानकावर वाढत्या गर्दीमुळे आणि अपुऱ्या नियोजनामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली आहे. “रेल्वे प्रशासनाचे थोडे जरी नियोजन चुकले तर त्याचे परिणाम विदारक असू शकतात, याचे उदाहरण परळ एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेत मुंबईने पाहिले. आता बदलापूर स्थानकावरही तसाच धोका निर्माण झाला आहे. अचानक लावलेले फेन्सिंग आणि गोंधळलेल्या प्लॅटफॉर्म उभारणीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे, तरीही प्रशासन दुर्लक्ष का करत आहे?” असा सवाल करत त्यांनी रेल्वेच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे.