वडिलांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनीच घेतला अखेरचा श्वास, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं निधन; ‘या’ आजारानं होते त्रस्त
VIDEO | नागपूरहून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने थेट उपचारांसाठी दिल्लीला रवाना मात्र उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
चंद्रपूर : चंद्रपुरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गेल्या शनिवारी म्हणजेच २७ मे रोजी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळीच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरहून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने थेट उपचारांसाठी दिल्लीला दाखल करण्यात आले होते. यावेळी सुरू असलेल्या उपचारांशी त्यांची झुंज अपयशी ठरली. २०१४ ला ते आमदार असताना त्यांच्यावर स्थुलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तर त्यांच्या आतड्यांमध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यानंतर आतड्यात इंफेक्शन झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. बाळू धानोकर यांच्या पार्थिवावर वरोरा येथे उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तींनी कळवले आहे.