‘खांद्यावर हात ठेवायचा अन् त्याचाच खेळ खल्लास…’, सामनातून पुन्हा भाजपवर हल्लाबोल
VIDEO | 'गरज सरो वैद्य मरो...', दैनिक सामनातील अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका
मुंबई : दैनिक सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ही टीका करत शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा भाजपला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. गरज सरो वैद्य मरो हेच भाजपचे काम व ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा खेळ खल्लास करायचा हेच त्यांचे धोरण. म्हणूनच शिवसेनेने स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वाभिमानी बाण्याने भाजपपासून लांब जाणे पसंत केले. श्रीमंतांची गुलामी पत्करण्यापेक्षा आपली स्वाभिमानाची मीठ-भाकरी बरी हे धोरण अवलंबिले. भाजपास विरोधकांचे सोडाच, पण आपल्या मित्रांचे व सहकाऱ्यांचेही ‘हित’ बघवत नाही, असे म्हणत दैनिक सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आलाय तर शिंदे गटावर देखील सडकून टीका केल्याचे या आजच्या अग्रलेखातून पाहायला मिळत आहे, मिंधे गटाच्या चाळीस कोंबडय़ा महाराष्ट्रात व 13 तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराडय़ात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवरून कधी सुऱ्या फिरतील सांगता येत नाही. खुराडय़ात आज दाणे घातले जात आहेत. आधी दाणा, मग कापती माना! कीर्तिकर यांनी ‘मान’ सांभाळावी, असे म्हणत सावध इशारा देखील सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.