Maratha Reservation Protest | जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवर अजित पवार यांची भूमिका काय?
VIDEO | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, ट्विटवर मांडली सविस्तर भूमिका, काय म्हणाले अजित पवार
मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासह आपण मराठा आंदोलकांसोबत आहोत, अशी भूमिका अजितदादांची असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्वीटवर अजितदादा असे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो, असे अजित पवार म्हणाले.
पुढे ते असेही म्हणाले की, राज्यातील मराठा आंदोलनानं लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानंच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असं आवाहन मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना आहे.