Ajit Pawar : ‘…मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता’, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना थेट इशारा
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटणचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी साताऱ्यातील फलटण येथे अजित पवारांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अजित पवार यांनी माजी मंत्री व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर चांगलाच निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.
साताऱ्यातील फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचारसभेत बोलत असताना अजित पवार यांनी माजी मंत्री व आमदार रामराजे नाईक निंबाळकर चांगलाच इशारा देत भर सभेतून ओपन चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले. “तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता”, असं म्हणत अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांना इशारा देत एकप्रकारे दमच भरलाय. दीपक चव्हाण हे फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. पुढे अजित पवार हे रामराजे नाईक निंबाळकरांना उद्देशून म्हणाले की, ”तुम्ही बंद दाराआड बैठका घेता, मात्र तुमच्यात धमक असेल ना तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जा मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता’, असा इशारा त्यांनी दिला. तर रणजीत सिंह नाईक निंबाळकर मला सांगत होते, श्रीराम सहकारी साखर कारखाना त्यांनी सुरू केला. या लोकांनी हा कारखाना इतरांना चालवायला दिला आहे. साखर कारखाना काढल्यानंतर सात वर्षात सरकार मदत करून कारखान्याला कर्जमुक्त करतं. तुम्ही २५ ते ३० वर्षे झाली कारखाना चालवत आहात. एक अख्खी पिढी या कारखान्यावर मोठी झाली. मग तुम्ही नेमकं करता काय? तुमच्यात धमक आणि ताकद नाही का? तुम्ही तर श्रीमंत राजे आहात, असंही अजित दादांनी म्हणत रामराजेंना फटकारलं.