माझ्याकडे कागद, सगळ्यांना उघडं पाडणार, देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं अन् काय दिला इशारा?
tv9 Marathi Special Report | कंत्राटी भरतीचं पाप महाविकास आघाडीचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांमध्ये कंत्राटी भरतीच्या मुद्दयावरून चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर सरकारनं रद्द केलाय. देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा करताना महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केलीय. त्याला विरोधकांनीही त्याच पद्धतीनं उत्तर दिलं आहे. कंत्राटी भरतीच्या प्रकरणावरून राजकारण पेटल्याचे पाहायला मिळत आहे. कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन राज्यभरात नाराजीचा सूर आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून तरुणाई रस्त्यावर उतरली आणि कंत्राटी भरतीला तीव्र विरोध केला. अशावेळी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा करतानाच देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. कंत्राटी भरतीचं पाप महाविकास आघाडीचं आहे, असा आरोप करत फडणवीसांनी ठाकरेंच्या सहीचा कागद दाखवला. आणि शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचं आघाडी सरकार आणि नंतरच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटी भरतीचा दाखला देत, उघडं पाडण्याचा इशाराही दिलाय.