खायला गेले व्हेज, ताटात सापडला मेलेला उंदीर, ग्राहक थेट रुग्णालयात; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलातील धक्कादायक प्रकार
मुंबईतील या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील ग्राहकाच्या व्हेज जेवणात मृत उंदीर सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर आता महानगर पालिकेच्या आरोग्य खात्याकडून हॉटेलमध्ये चौकशी केली जात आहे.
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील ग्राहकाच्या व्हेज जेवणात मृत उंदीर सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर आता महानगर पालिकेच्या आरोग्य खात्याकडून हॉटेलमध्ये चौकशी केली जात आहे. प्रयागराज येथील राजीव शुक्ला यांनी वरळी येथील बारबेक्यू नेशनला भेट दिली. या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली आणि दाल मखानीमध्ये मृत उंदीर खाताना सापडल्याचा दावा राजीव यांच्याकडून करण्यात आला आहे. घटनेनंतर राजीव यांना उलट्या होऊन 75 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्ला यांनी बारबेक्यू नेशनचे मालक, व्यवस्थापक आणि शेफ यांच्याविरुद्ध नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली परंतु अद्याप एफआयआर झाली नसल्याचं शुक्लांकडून सांगण्यात येत आहे.