अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ, शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया, दीपक केसरकर काय म्हणाले?
मुंबईत विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात अब्दुल सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं.
मुंबईः अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून महाराष्ट्र प्रचंड तापला आहे. मी महिलांचा अपमान केलेला नाही, त्यांना शिवीगाळ केलेली नाही, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलंय. तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, असं सत्तार म्हणत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस सध्या प्रचंड आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याशिवाय त्यांना मंत्रालयात काम करू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.
यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांना ज्या सूचना द्यायच्या असतील, त्या मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येतील. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. एखाद्या व्यक्तीकडून चुकून स्टेटमेंट झालं असेल आणि दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ते प्रकरण शांत होतं….
शेवटी वक्तव्य हे रागापोटी आलेलं आहे का, हेतू पुरस्सर झालं आहे का, हे तपासून पहावं लागेल. अशा तऱ्हेचं व्यक्तिगत टिप्पणी करणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.
औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया यांना शिवीगाळ केली. माध्यमांशी बोलतानाच हे शब्द वापरल्याने त्यांचे शब्द वाऱ्यासारखे पसरले. संपूर्ण महाराष्ट्रात या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
मुंबईत विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात अब्दुल सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. सत्तार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या खिडक्यांचा काचा फुटल्या.
विद्या चव्हाण तसेच इतर आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. तर औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांच्या राहत्या घरावरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तोडफोड केली आहे.