लक्ष्मण जगताप माझे चांगले मित्र पण…;नाना काटेंच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे मैदानात
पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. इथं बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नाना काटे यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. पाहा त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडीची काल पिंपरी-चिंचवडमध्ये सभा झाली. यात बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नाना काटे यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. तसंच लक्ष्मण जगताप यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणी जागवल्या. “खरंतर ही पोटनिवडणूक लागायलाच नको होती. लक्ष्मण जगताप माझे चांगले मित्र होते. असं वाटलं नव्हतं की ते इतक्या लवकर जातील. पण दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेले आणि पोटनिवडणुक लागली. लक्ष्मण भाऊंचा 32 वर्षाचा राजकीय प्रवास माझ्या नजरेसमोर येतोय. यातील 25 वर्ष त्यांच्या डोक्यावर शरद पवार आणि अजित पवारांचा हात होता. तेव्हा त्यांना सोन्याचे दिवस होते.नंतर त्यांना काय मिळालं हे तुमच्या समोर आहे. पिंपरी चिंचवडची सगळ्यात जास्त वाट ही भाजपने लावलीये. त्यामुळे आता नाना काटेंना निवडून देणं गरजेचं आहे”, असं धनंजय मुंडे म्हणालेत.