एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजी मंत्र्याची ठाकरे गटात घरवापसी
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे तसेच ठाकरेंनी पुत्र योगेशला उमेदवारी देऊन आपल्यावर फार मोठे उपकार केल्याने शिंदे गटाचा राजीनामा देत आहे', शिंदेंना पाठविलेल्या राजीनामा पत्रात बबन घोलप यांनी असं म्हटलं अन् रामराम ठोकलं
माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटाला रामराम करत पुन्हा उद्धव ठाकरे गटात घरवापसी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बबन घोलप यांचा पक्षप्रवेश पार पडला. गेल्या काही दिवसांपूर्वीच बबन घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, बबन घोलप यांचा पुत्र आणि माजी आमदार योगेश घोलप यांना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून योगेश घोलप यांना नाशिक देवळाली या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबन घोलप निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज होते. ६ एप्रिल रोडजी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत बबन घोलप यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाने ठाकरे गटातच राहणं पसंत केलं होते. लोकसभेच्या वेळी बबन घोलप यांनी शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा, तर योगेश घोलप यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार केला असल्याचे पाहायला मिळाले होते.