Unseasonal Rain : कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, वादळासह अवकाळीनं राज्याला झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यामध्ये कुठे कुठे हा अवकाळी पाऊस बरसला आहे, गारपीट झाली आहे.
राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे पिकांची नासाडी झाल्याने बळीराजा हवालदिल झालाय. राज्यातील विदर्भ भागातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना मेघगर्जनेसह वादळी वारा आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला असून रात्रीपासून नागपूरसह परिसरात पाऊस बरसतो आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. साताऱ्याच्या महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर पाणी साचलं. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय.
सोलापूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. सोलापूर अक्कलकोट मार्गावर पाऊस बरसला. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळला. ठिकठिकाणी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
बुलडाण्याच्या चिखली, नांदुरा, मोताळा या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गंगापूर, ठाणेपाडा या परिसरातील 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.