Jalgaon MSRTC Bus Accident : ट्रकनं कट मारला अन् एसटी बस थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं?
जळगावातून एक मोठी माहिती समोर येत आहे. जळगाव येथे एका एसटी बसला ट्रकने कट मारल्याने बस थेट राष्ट्रीय महामार्गाखाली खड्ड्यात उतरल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने यामध्ये कोणीही दुर्घटना झाली नाही.
जळगावमध्ये एका ट्रकने एसटी बसला कट मारल्याचे समोर आले. या ट्रकने कट मारल्याने एसटी बस राष्ट्रीय महामार्गाखाली खड्ड्यात उतरल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गाखाली एसटी बस उतरल्यानंतर झाडाझुडपांमध्ये ही बस अडकली आणि मोठी दुर्घटना टळली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील निंभोरे गावाहून ही बस जळगावच्या दिशेने येत होती त्यावेळी हा अपघात झाला. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नसल्याची माहिती मिळत आहे. जळगाव शहरातील आहुजा नगर ते द्वारका नगर स्टॉप दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या एसटी बसमध्ये साधारण 25 प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही काहीही दुखापत झालेले नसल्याची माहिती बसच्या चालक आणि वाहकाने दिली.
हा अपघात झाल्यानंतर कट मारणारा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे एसटी बसच्या चालक आणि वाहकाने सांगितले. या अपघातामुळे प्रवासी आणि चालक-वाहक घाबरलेल्या अवस्थेत होते. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. ट्रकने कट मारल्याने एसटी बस राष्ट्रीय महामार्गाखाली खड्ड्यात उतरली असल्याने बस क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.