Jalna News : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला; जालन्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचं आंदोलन
Hunger Strike For Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी जालना जिल्ह्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील अकोला गावात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने विहिरीत उतरून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विहिरीत बाज टाकून त्यावर या कारभारी मसलेकर या पदाधिकाऱ्याने कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
प्रशासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात तसा उल्लेख देखील केला होता. नव्या सरकारची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत 2 अधिवेशन झाले आहेत. पण एकही अधिवेशनात 100 टक्के कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत, म्हणून आज शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू केलं असल्याचं यावेळी बोलताना उपोषणकर्त्याने सांगितलं.