19 जागा मिळतील राऊत याचं विधान, शरद पवार याचं सुचक वक्तव्य; त्याला अजून…
कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयानंतर इतर राज्यातील विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातही महाविकास आघाडीत राजकीय समीकरणांवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपचा दारुण पराभव केला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयानंतर इतर राज्यातील विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातही महाविकास आघाडीत राजकीय समीकरणांवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे राजकीय हालचालींना वेग आला असतानाच आणि लोकसभा एकत्र लढू अशी घोषणा झाली असता जागावाटपावरून मविआत तिढा वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल मोठं विधान केलं. त्यांनी आमचे लोकसभेत 19 खासदार राहतील असं म्हटलं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. त्याला अजून अवकाश आहे. राऊतांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तर प्रत्येकाला असा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसू आणि यावर सामंजस्याने मार्ग काढू असे पवार म्हणाले.