रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ आणि धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवलीतील सावडाव धबधबा नुकतंच प्रवाहित झाला आहे.
पर्यटकांची निराशा
माञ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटकांसाठी सावडाव धबधबा बंद करण्यात आला आहे. हा धबधबा प्रवाहित झाला असला तरी यंदाही कोरोनामुळे या धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या सावडाव धबधब्यावर दरवर्षी जिल्ह्यातील अनेक जण भेट देत असतात. त्यासोबतच गोवा, कोल्हापूर, पुणे, नाशिक या ठिकाणाहून पर्यटक आवर्जून जाताना दिसतात. मात्र यंदा पर्यटकांची निराशा होणार आहे.
कणकवलीतील सावडाव धबधबा
दरवर्षी कणकवली तालुक्यातील सावडाव हा धबधबा पावसाळय़ात पर्यटकांनी बहरतो. 60 ते 70 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या शुभ्र धारा डोळय़ांचे पारणे फेडतो. मुंबई-गोवा महामार्गावरील वेळणे फाटा येथून या धबधब्यावर जाता येते. धबधब्याच्या प्रवाहाच्या बाजूलाच गुहेसारखा भाग असून येथील विस्तीर्ण डोह आहे. त्यात अनेक पर्यटक डुबण्याचा आनंद घेतात.