Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज, मुंबईत मोठी फसवणूक, नेमकं काय घडलं?
मुंबईतील मानखुर्दमधील ६५ महिलांच्या नावांवर २० लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेमकं काय घडलं बघा?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली. केवळ ही योजना जाहीर केली नाहीतर ही योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेतंर्गत २१ ते ६५ वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. ही योजना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी महायुतीकडून जाहीर करण्यात आली. या योजनेचे कित्येक लाभार्थी देखील आहे. मात्र अशातच लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई सारख्या ठिकाणातून समोर आला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक झाल्याची एक बातमी समोर येत आहे. बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील मानखुर्द येथील तब्बल ६५ महिलांच्या नावावर २० लाख रूपयांचं कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर आरोपींमध्ये मानखुर्दमधील एका महिलेसह चार ते पाच जणांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे ६५ महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपींमध्ये वित्त कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून मिळतेय.