Ladki bahin yojana : पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार ‘लाडक्या बहिणी’ अपात्र, कारण नेमकं काय?
पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेमध्ये आतार्यंत १० हजार बहिणी अपात्र ठरल्याचे समोर आले तर अद्याप पुण्यातील १२ हजार अर्जांची छाननी बाकी असून पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार महिला अर्जदारांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रलंबित अर्ज कधी अॅप्रूव्ह करणार याकडे अर्ज करणाऱ्या महिलांचे लक्ष लागलेले होते. मात्र आता विधानसभेच्या निकालानंतर पुण्यात लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेमध्ये आतार्यंत १० हजार बहिणी अपात्र ठरल्याचे समोर आले तर अद्याप पुण्यातील १२ हजार अर्जांची छाननी बाकी असल्याची माहिती मिळत आहे. महिला बालकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार महिला अर्जदारांनी योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. तर अद्याप उर्वरित १२ हजार अर्जांची छाननी बाकी आहे. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेत उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये, तसेच चार चाकी वाहन नसावं, तसेच लाभार्थींनी अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही अट सरकारने घातली आहे.