शेतकरी आत्महत्या; अजित दादांचा गंभीर आरोप, म्हणाले हे सरकार आल्यापासून….
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज सकाळपासूनच दौऱ्यावर निघाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.

पुणेः शेतकरी आत्महत्यांवरून अजित पवार यांनी गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार आल्यापासून रोज शेतकरी आत्महत्या घडतायत. दोज 3 ते 4 शेतकरी आत्महत्या होतात, असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय. या वर्षी राज्यात भरपूर पाऊस होऊनदेखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडे आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय उरतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज सकाळपासूनच दौऱ्यावर निघाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.
अजित पवार म्हणाले, ‘ एवढा पाऊस पडूनही आत्महत्या करतायत. कारण काय तर त्यांना नुकसान भरपाई मिळत नाहीये. काहींचं खरीपाचं पिक गेलं, नंतर रब्बी गेलं. इतरही विविध पिकं, मका वगैरे गेली. ही अवस्था आहे.
अजित पवार यांनी आज सकाळीदेखील माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर टीका केली. शिंदे गटाने झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा राबवला, असा आरोप केलाय.
यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, या टीकेला काही अर्थ नाही. कारण त्या वेळेला एकनाथ शिंदे माझ्या उजव्या बाजूला बसायचे. तेव्हा ते काही असं म्हणाले नाहीत. आता फक्त राजकीय टीका करायची म्हणून हे वक्तव्य आलंय.
एकूणच ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करणं अजित पवारांना टाळलं. हा शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा विषय आहे.
पण दसऱ्यासारखा महत्त्वाचा सण असतानाही महाराष्ट्रानं ही भाषण ऐकली. कारण दोन नेते काय बोलतात, याचं सर्वांनाच कुतूहल होतं.
दोन्हीकडे गर्दी जमली. पण ती कशी होती, कुठून आली होती, हेही सर्वांनी पाहिलं. मीसुद्धा माध्यमांवर हे पाहिल्याचं अजित पवार म्हणाले.