रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल होताच म्हणाले; ‘बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे….’
“आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टीकोनातून आम्ही ते वक्तव्य केलं. हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं. असंघटितपणामुळे आजपर्यंत फायदा घेतला गेलाय. गुन्हा दाखल झाला असेल नोटीस येईल तेव्हा बघू”, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.
महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. महंत रामगिरी महाराज केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वैजापूर, येवल्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “बांगलादेशात जो प्रकार घडला, आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहे. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केला. कोटी-दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं. बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो. त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे”, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.