‘पत्रकारांनो अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल’, नीलम गोऱ्हे यांचं सूचक वक्तव्य
नीलम गोऱ्हे या आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या संदर्भात एक सवाल करण्यात आला. या प्रश्नावर बोलताना त्यांनी पत्रकारांना अलर्ट राहण्यास सांगून सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल, असं सूचक वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. तर महाराष्ट्राचं राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर राजकारणात कधी, कोण, काय भूमिका घेईल हे सांगता येत नाही, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांना केला असता त्यांनी सूचक वक्तव्य करत “पत्रकारांनी अलर्ट राहा. कारण तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देताना धावपळ होईल. महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे आत्ताच त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आमचे लोक सगळीकडे लढायला तयार आहेत. भाजप आणि शिवसेनेची खूप वर्षांची युती आहे. त्यामुळे मला वाटत नाही आमच्यात कुठले प्रश्न येणार आहेत”, असे म्हटले आहे. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधीकडून पुन्हा सवाल करण्यात आला की, मग अजित पवार स्वतंत्र लढणार का?, त्यावर नीलम गोऱ्हे यांनी सूचक वक्तव्य केलं. “मी असं काहीही बोलले नाही. माझ्या तोंडी घालू नका. पण राजकारण बदलत आहे.”, असे त्या म्हणाल्या.