Tv9 Exclusive | ‘त्या’ एका तांत्रिक चुकीमुळे ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली? राहुल नार्वेकर यांनी स्पष्टच म्हटलं…
आपात्रतेच्या निकालात 2018 चं शिवसेनेचं दुरुस्त केलेलं संविधान ग्राह्य धरलं नाही. तर शिंदे गटाने दावा केलेल्या 1999 च्या घटनेला राहुल नार्वेकर यांनी ग्राह्य केलं. याच निकालावर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले?
मुंबई, ११ जानेवारी २०२४ : आपात्रतेच्या निकालात 2018 चं शिवसेनेचं दुरुस्त केलेलं संविधान ग्राह्य धरलं नाही. तर शिंदे गटाने दावा केलेल्या 1999 च्या घटनेला राहुल नार्वेकर यांनी ग्राह्य केलं. याच निकालावर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. यावर राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असे होते की, ज्यावेळी दोन गट वेगवेगळ्या संविधानाचा संदर्भ देतात तेव्हा वाद सुरू होण्यापूर्वी जे संविधान निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर असेल ते तुम्ही ग्राह्य धरा. त्यामुळे माझ्याकडे निर्णय घेण्यासारखं काही विशेष नव्हतं. जे निवडणूक आयोगाने सांगितलं ग्राह्य संविधान आहे, ते मी रेकॉर्डवर घेतलं. त्यानुषंगाने मी कारवाई केली. त्यामुळे त्याबद्दल कुणाचा आरोप असण्याचा प्रश्न येत नाही. संविधान घेतल्यानंतर संघटनात्मक रचना काय आहे शिवसेनेचं याची विचारणा मी निवडणूक आयोगाकडे केली. त्यांच्या संकेतस्थळावर पाहिलं. तेव्हा 2018 मध्ये जी लोकं निवडून आली तीच लोकं संघटनात्मक रचनेचं प्रतिनिधीत्व करतात असं मी ग्राह्य धरलं, असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या ऑर्डरमध्ये पॅरेग्राफ 168 मध्ये असं लिहिलंय की, पक्षाच्या संविधानाशी संलग्न असणारं संघटनात्मक रचना ग्राह्य धरा. म्हणजेच ते जे संघटनात्मक रचना आहे, पक्षातील संविधानात जी तरतूद आहे, किती लोक कार्यकारिणीत निवडून आले पाहिजे, किती लोकांची नियुक्ती केली पाहिजे हे संलग्न आहे का बघा. ते आम्ही तपासलं. तेव्हा १९९९च्या संविधानात ज्या तरतुदी होत्या, त्याच्याशी हे संघटनात्मक संरचना संलग्न नव्हतं, असेही त्यांनी यावेळी म्हटले.