आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी ‘वर्षा’वर खलबतं? राहुल नार्वेकर अन् मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन शिल्लक असताना राहुल नार्वेकर आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक झाली
मुंबई, ७ जानेवारी २०२४ : गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची प्रतिक्षा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला लागलेली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन शिल्लक असताना राहुल नार्वेकर आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. राहुल नार्वेकर हे वर्षावर दाखल होत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही गुप्त बैठक होती मात्र माध्यमाला या भेटीची कुणकुण लागली. तीन दिवसांवर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या गुप्त बैठकीवेळी दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजर नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.