Talathi Bharti Result | तलाठी भरतीचा निकाल वादात, विद्यार्थ्याला २०० पैकी २१४ गुण? नेमकं प्रकरण काय?
तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप
पुणे, ८ जानेवारी २४ : तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात ट्विट करून या परीक्षेच्या भरती मध्ये आणि निकालात घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. दुसऱ्या बाजूला, पुरावे द्या कारवाई करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. तर तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही शिवसेना ठाकरे गटाकडून केली जात आहे.